नीला र. मेहेंदळे -
नर्मदा परिक्रमेची पथ्यं चौकटीतल्या जगण्याला छेद देणारी आहेत. ती पाळणं सोपं नाही. स्व-अहंकार नर्मदेत विरघळवून टाकणं जमायला हवं. नर्मदेच्या तीरावरून चालताना कधी भय वाटत नाही, एकाकीपणा जाणवत नाही आणि पश्चात्तापही होत नाही. येथे जगण्याला एक लय अभावितपणे येते...
नर्मदा परिक्रमा चालत करण्याचं फार पूर्वी योजलं होतं. या विषयावर मी काहीही वाचलेलं नव्हतं; मात्र मनात सुप्त आकर्षण होतं. २००६ मध्ये शूलपाणीच्या जंगलापर्यंत मी आणि सौ. हर्षेबाई गेलो होतो. तेथून पुढे प्रवासामध्ये आमची जबाबदारी स्वीकारण्याचं सोबतच्या पुरुष गटानं नाकारलं. हिरमुसल्या मनानं आम्ही परतलो. परत एकदा परिक्रमेच्या विचारानं उचल खाल्ली. आणि आम्ही 2008 च्या नोव्हेंबर महिन्यात निघालो. ती पूर्ण केली. काही नावेमधून व काही चालत. संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक पाठिंब्याशिवाय हे शक्य झालं नसतं. मधल्या काळात या मार्गात बऱ्याच सुविधा मिळू लागल्या होत्या. चोऱ्यामाऱ्या, लुटमारीचं प्रमाण कमी झालं होतं. त्या प्रवासातले अनुभव एक महिला पुरोहित म्हणून निश्चितच मला नव्यानं काही शिकवून गेले. विचारप्रवर्तक ठरले.
त्या काळात ना आम्हाला कधी भय वाटलं, ना एकाकीपण. ना पश्चात्ताप. तेथे आपली भोगलालसा आपसूक कमी होते. उघड्यावाघड्या ठिकाणी आन्हिकं उरकायचीही मग लाज वाटत नाही. दगड-माती, पाला-पाचोळा, चिखलाची जमीन, काहीही निजण्याच्या आड येत नाही. जगण्याचा "स्टेटस सिंबॉल' इथं नाही; तथापि जगण्याला अभावितपणे आलेली एक लय आहे. भुकेची जाणीव विसरायची असते, हे शिकवलं परिक्रमेनं. घरी साडेआठ वाजता वाफाळलेला नाश्ता हाती येतो, तेव्हा तुम्हाला भुकेची जाणीव असते का? नाही. ती असते तुमची सवय. समोर काहीही खायला नसतं तेव्हा होते ती भुकेची जाणीव. अर्थात नर्मदामाईच्या सान्निध्यात जाणिवानेणिवांच्या पलीकडे आपण गेलेलो असतो. या काळात आदिवासींच्या आश्रमशाळा पाहिल्या, छोटी-छोटी खेडी पाहिली, तिथली माणुसकी अनुभवली, त्याचप्रमाणे मुलींमधली असुरक्षिततेची भावनाही. तिथल्या राजकीय दबावामुळे तरुण मुलींना सायंकाळनंतर एका खोलीत कोंडलं जातं. सगळे विधी तिथेच. कारण त्याचं शील सुरक्षित राहावं म्हणून. हा एक अदृश्यसा ओरखडा होता आमच्या मनावर कोरला गेलेला. पोटाची खळगी भरण्यासाठी होणारी लाचारी आणि तरीही स्वत:जवळच्या चार भाकऱ्यांमधली एक भाकरी परिक्रमावासीला देण्याची दानतही इथंच पाहायला मिळाली. अशा घटना आपल्या मूलगामी विचारांची मुळं घट्ट करतात. जिवात शिव बघणारा आपला धर्म. त्याचं प्रत्यंतर प्रवासात येत होतं. परिक्रमेत स्त्रियांना अतिशय मान दिला जातो. त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलेल्यांना गावच्या मुखियातर्फे वाळीत टाकलं जातं. ही आपली खरी संस्कृती आहे.
पर्वकाळात आम्ही गरुडेश्वरी होतो. तिथं महिलांना यज्ञभाग करू देत नाहीत, आणि मला तर दत्तजयंतीचा हा योग साधण्याची आत्यंतिक इच्छा! मग गरुडेश्वर संस्थानचे विश्वस्त श्री. देव यांची परवानगी घेतली. सात किलोमीटरवरून चालत जाऊन यज्ञाचं साहित्य घेऊन आले आणि त्यांच्या यज्ञशाळेत शेकडो नजरांच्या साक्षीनं अवर्णनीय "पंचायतन स्वाहाकार' संपन्न झाला. गावकरी, परिक्रमावासी, इतर विश्वस्त यांच्या उपस्थितीत हे सत्कर्म घडलं. स्वामी वासुदेवानंद सरस्वतींचं स्थान आहे तिथं. ही पर्वणी असते आणि ती मला साधता आली. त्या निमित्तानं समाजाला महिला पुरोहित हे काम उत्तम तऱ्हेनं करू शकतात, हे कळलं. जबलपूरला गीताधामशेजारी भक्तिधाम आहे. तिथं स्वामी अशोकानंद यांच्या उपस्थितीत संक्रांतीला हाच याग केला. आजही माझ्या कानांत त्यांचे शब्द आहेत. या यागासाठी वापरलेल्या विटांना स्पर्श करीत स्वामीजी म्हणाले होते, ""आपल्या स्तोत्रांनी, स्वरांनी पवित्र झालेल्या या विटा भविष्यात इथल्या नियोजित मंदिराच्या बांधकामासाठी वापरता याव्यात, म्हणून मी त्या बाजूला ठेवत आहे.'' महाराष्ट्रामधली एक साधी महिला याग कसा करेल? संस्कृत शब्दोच्चार, लय, स्वर यांची गल्लत तर करणार नाही ना, अशा अनेक रास्त शंका त्यांना होत्या. मात्र, यज्ञाची सांगता झाल्यावर त्यांनी पसंतीची ही पावती दिली. काय पाहिजे माझ्यासारखीला अजून? हे मिळालेलं समाधान शब्दातीत आहे. त्याचे खरे मानकरी आहेत... फडके गुरुजी, शंकरराव थत्ते, श्री. कामेरीकर, विजया भिडे अशा गुरूंमुळे अल्पशी सेवा करू पाहत आहे.
परिक्रमेत परीक्षा पाहणारी प्रलोभनंही समोर आली होती. एका खूप श्रीमंत माणसांच्या घरी एकत्र कुटुंबात - गोकूळच होतं ते; आमचा पाहुणचार झाला. नंतर मोठ्या खोलीमध्ये एका पाटावर त्यानं मला बसवलं. भिंतीशी बरीच कपाटं होती, ती उघडली. त्यातून पाचपाचशे रुपयांची बंडलं काढली. माझ्यासमोर टाकली, ""जितना चाहे उठा लो, आप जैसे परिक्रमावासीकोही मैं ये धन देना चाहता हूँ'', असं तो म्हणाला. सतरंजीवर विखुरलेल्या नोटा, यजमानाचं ते अनपेक्षित भाष्य, यातून सावरण्यातच मला दोन मिनिटं लागली. भानावर येऊन पैसे घ्यायला मी नम्रपणे नकार दिला. तो धनवान थोडा नाराज झाला. ""जिन्हे मैं ये धन देना चाहता हूँ, वो लेते नही, और जो मॉंगते है, उन्हे मैं देना नही चाहता, ये पैसे तिजोरीमें कबसे पडे है, क्या करूँ?'' ते गृहस्थ आमची सत्त्वपरीक्षा बघत होते, की त्यांच्या रूपानं नर्मदामाई?
""या भागात "ब्लॅक मॅजिक' खूप चालतं. काळ्या कपड्यातले दोन तांत्रिक आमच्या मागेपुढे वावरत होते. चेहरा नसलेला गणपती, हात नसलेली देवी असे देव मांडून रात्री साडेअकरा ते पहाटे तीन या वेळेत तांत्रिक अनुष्ठानासाठी बसत. भय वाटावं असा एकूण प्रकार. पण खोकसर गावी लाल कपड्यात वावरणारा वैदू "लालबाबा' आम्हाला भेटला. तीन दिवसांनी त्याचं सव्वा वर्षाचं मौनव्रत सुटणार होतं. रात्री जंगलात, एखाद्या ओसरीवर आम्ही झोपलो, की हा लालबाबा आमच्याभोवती एक लक्ष्मणरेषा आखून देत असे. "अगदी नैसर्गिक विधीसाठीसुद्धा ती ओलांडू नका; अन्यथा मी कसलीही मदत करू शकणार नाही,'' असं सांगून तीन रात्री लालबाबानं तांत्रिकापासून आमचं रक्षण केलं. प्रश्न पडतो, आमच्यासाठी तो तथाकथित अश्वत्थामा होता का? ""परिक्रमेच्या अखेरच्या टप्प्यात असताना आम्ही रात्री एका देवळात उतरलो होतो. तिथल्या पुजाऱ्याची आणि या दोन्ही तांत्रिकांची काही बाचाबाची झाली. पुजारी ऐकत नाही, म्हटल्यावर त्यांनी एका खुर्चीत पुजाऱ्याला बसवलं आणि ""अभी दो घंटे तुम इधरसे हिल नही सकोगे'' असं म्हणून तांत्रिक निघून गेले आणि खरंच तो पुजारी उठायचा प्रयत्न करी, तर खुर्चीसकट उभा, चालायला लागे, तर खुर्चीसह. हे काय गूढ होतं? आम्ही अचंबित होऊन पाहत राहिलो. आम्ही "ब्लॅक मॅजिक'चा अनुभव घेतला त्याचा हा "आँखो देखा हाल'.
अशा अनुभवांना सामोरं जाणं शक्य झालं ते गुरूंच्या आशीवार्दानं. स्वत:कडे त्रयस्थ आणि तटस्थ वृत्तीनं पाहण्याची, आत्मपरीक्षण चिंतन करण्याची सवय गुरूंमुळे लागली. असार संसारात प्राप्त कर्तव्य शुद्ध भावनेनं, ओढीनं पार पाडायचं असतं, याचं भान आलं. मैत्रेयी, गार्गी यांचं संसारात आचरण कसं होतं, याचं निरीक्षण अभ्यासादरम्यान केलं. वास्तविक पाहता, महिला वर्गामुळे आपला धर्म जिवंत राहिला आहे. शिवाय यज्ञयागाच्या वेळी होणाऱ्या श्लोकपठणाच्या स्वरकंपनानं पंचमहाभूत जागृत होतात. वातावरणावर सकारात्मक परिणाम होत राहतो. समाजहिताच्या, नव्या पिढीच्या संस्कारांसाठी हे सारं आवश्यक आहे, असं मला वाटतं. कुलाचार, श्राद्धपक्ष, गौरी-गणपती आदी यथास्थित होतात ते सश्रद्ध महिलांमुळे. म्हणून मी पौरोहित्याचे वर्ग खास महिलांसाठी सुरू केले, त्याला 24 वर्षे झाली. या रौप्यमहोत्सवी वर्षात काहीतरी निराळं करावं, असं वाटतंय. पाहू, गुरूंच्या आशीर्वादानं काय घडेल ते.
रामकृष्ण मिशनचे संस्कार लहानपणी झाले. मठातल्या स्वामींची प्रवचनं ऐकली. शाश्वत जगण्याची अध्यात्माशी जोड घालता आली. अंतर्मन बाह्यमनाचं प्रतीक असतं. पंचवीस वर्षांपूर्वीची मेहेंदळे बाई आज नक्कीच बदलली. वय, अनुभव याचा परिणाम होतो. आचरणात फरक पडतो. भोगलालसा कमी होते. समतोल विचार करण्याची सवय लागते. आपला अंतरात्मा सजग हवा, म्हणजे झालेला बदल जाणवतो. विज्ञान आणि अध्यात्म हातात हात घालून आले, तर अंधश्रद्धा आणि श्रद्धा यांच्यामधली धूसर रेषा सुस्पष्ट दिसते. अर्थात, मी परिपूर्ण आहे, असा दावा नाही. नर्मदा परिक्रमा करणारे अगणित आहेत. माझ्यासारखीचे अनुभव सांगतात, की चौकटीतल्या जगण्याला छेद देणारी काही पथ्यं परिक्रमेची आहेत. ती पाळणं सोपं काम नाही. स्व-अहंकार नर्मदेच्या पाण्यात विरघळून टाकणं जमलं पाहिजे. नर्मदा परिक्रमेचा खरा अर्थ काय? प्रलोभनं, मोह, मायाजालातून स्वत:ला निर्मोही बनवणं आणि नश्वरतेच्या, आधिभौतिक सुखाच्या कोंडीतून कमलपत्रासमान जपणं!
(शब्दांकन : वर्षा बेटावदकर)
Globalmarathi.com

टिप्पणी पोस्ट करा