मुख पृष्ठ    ब्लॉग विषयी     प्रतिक्रिया 

२३ एप्रि, २०११

मोबाईल, लॅपटॉप एका मिनिटात होणार चार्ज

संदीप खांडेकर : सकाळ न्यूज नेटवर्क

कोल्हापूर - मोबाईल, लॅपटॉप किंवा कॅमेऱ्याची बॅटरी केवळ एका मिनिटात चार्ज झाली तर..? तुम्हाला धक्काच बसेल ना...? पण, ही किमया साधली आहे शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागातील जस्मिन शेखने. तिने "सुपर कपॅसिटर'ला लागणारे अतिसूक्ष्म पदार्थ (नॅनो मटेरिअल्स) बनविले असून, त्याच्या माध्यमातून बॅटरी चार्ज कमीत कमी वेळेत होणे सोपे होणार आहे. तिने केलेल्या या संशोधनाची दखल घेऊन, पुढील संशोधनासाठी दक्षिण कोरियामधील हनयांग विद्यापीठाने तिला आमंत्रित केले आहे. येत्या जूनमध्ये ती कोरियाला रवाना होणार आहे.

जस्मिनने "डिपॉझिशन ऑफ नॅनोक्रिस्टॅलिन कॉपर ऑक्‍साईड बेस्ड थिन फिल्म्स बाय स्पिन कोटिंग टेक्‍निक ऍण्ड देअर कॅरॅक्‍टरायझेशन फॉर सुपरकपॅसिटर ऍप्लिकेशन' या विषयावर नुकतीच पीएच. डी. केली. या विषयाद्वारे तिने निसर्गाला पूरक असे सुपर कपॅसिटर उपकरण बनविले आहे. कमी किमतीत जास्तीत जास्त कार्यक्षम अशा ऊर्जा साठविण्याच्या नवनवीन पद्धतींवर संशोधन सुरू आहे. याच पठडीतले तिचे हे संशोधन आहे. सुपर कपॅसिटर हा ऊर्जा साठविण्याचा उत्तम पर्याय असल्याची मांडणी तिने प्रबंधात केली आहे. डॉ. पी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिने प्रबंध केला असून, तिला विभागप्रमुख डॉ. सी. एच. भोसले, डॉ. ए. व्ही. मोहोळकर यांचे सहकार्य मिळाले.

असे आहे सुपर कपॅसिटर...
सुपर कपॅसिटरची क्षमता फॅरॅड एककामध्ये असते. पारंपरिक कपॅसिटरची धारिता ही मॅक्रो किंवा पिको फॅरॅडमध्ये असते. या तुलनेत सुपर कपॅसिटरची धारिता ही कमीत कमी एक हजार पटीने जास्त आहे. सुपर कपॅसिटरमध्ये ऊर्जा ही विद्युत रासायनिक अभिक्रियेने (electro-chemical reaction) साठवली जाते. सुपर कपॅसिटर हे प्रमुख, विरुद्ध, संदर्भ या विद्युत अग्राने (electrode) व विद्युत अपघटनाने बनवलेले आहे. त्यात विद्युत प्रभार (charge) हा विद्युत अग्र व विद्युत अपघटन यांच्या मध्य स्थितीत साठवला जातो. ते सातत्याने विद्युत प्रभारित व विप्रभारित या कालचक्रातून जास्त धारा आणि कमीत कमी कालावधीत जाते. त्याच्या प्रभारीकरणाची वेळ ही काही सेकंदात आहे, असे जस्मिनने सांगितले. तसेच सुपर कपॅसिटरसाठी कॉपर ऑक्‍साईडपासून अतिसूक्ष्म पदार्थ बनविल्याचेही तिने स्पष्ट केले.

सुपर कपॅसिटरचे वैशिष्ट्य
विद्युत प्रभार साठवण्याची क्षमता जास्त असल्याने सुपर कपॅसिटरचा वापर विद्युत घट म्हणून केला जातो. त्याचे आयुष्यमान पारंपरिक विद्युत घटापेक्षा (बॅटरीपेक्षा) जास्त आहे. त्याचे आयुष्यमान सर्वसाधारणपणे तीस वर्षांचे आहे. त्याची धारता सुमारे अकराशे फॅरॅड पर ग्रॅम इतकी आहे. जस्मिनने बनविलेले सुपर कपॅसिटर संशोधनात वेगळेपण दाखविणारे आहे. सुपर कपॅसिटरमुळे मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरा व गाड्यांच्या बॅटरी जलद चार्ज होण्यास मदत होणार असल्याचे तिने सांगितले.

वाखरी ते कोरिया...
जस्मिन पंढरपूरपासून तीन किलोमीटरवरील वाखरी येथील आहे. तिचे महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून झाले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठात ती पुढील शिक्षणासाठी दाखल झाली. सुपर कपॅसिटरच्या पुढील संशोधनासाठी तिला वर्ल्ड क्‍लास युनिव्हर्सिटी प्रोग्रॅमअंतर्गत हनयांग विद्यापीठाने आमंत्रित केले आहे. यात अमेरिका, दक्षिण कोरिया व इटलीतील संशोधकांचा समावेश आहे.