मुख पृष्ठ    ब्लॉग विषयी     प्रतिक्रिया 

८ एप्रि, २०११

खरी कमाई

एका वर्गात संगीत, दुसऱ्यात संगणकाचा तास होता. त्या दोन्ही वर्गाच्या मध्ये असणाऱ्या वर्गात मास्तर घुसले. विद्यार्थ्यांनी उभं राहून अभिवादन केलं आणि सर्वजण आपापल्या जागेवर बसले. ‘गोष्ट, गोष्ट, गोष्ट’, अशी घोषणा थोडय़ाच वेळात सर्व पोट्टय़ांनी एका सुरात सुरू करून आख्खा वर्ग डोक्यावर घेतला. तास खरं तर विज्ञानाचा होता. मास्तरांनी एखादा शास्त्रज्ञ, गोलबुडाचा चंबू किंवा लिटमस-फिटमस यातला एखादा विषय शिकवायला सुरू केल्यावर मुलांचा गोंधळ कापूरवडीसारखा कुठल्या कुठे उडून गेला असता. पण ‘गोष्ट सांगण्याचं कबूल केल्यावरच पोट्टय़ांनी कल्ला बंद केला. वर्गात सगळीकडं एकाएकी मसणवटी शांतता पसरली. पोट्टे कुतूहलानं, गोष्ट ऐकायला मिळणार आहे म्हणून झालेल्या आनंदानं भरलेल्या डोळ्यांचे कान करून मास्तर काय बोलतात, याचा अंदाज घेऊ लागले. वर्गाची उत्सुकता न ताणता मास्तरांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली..
‘एकदा मी माझ्या मित्राला भेटण्यासाठी पुण्याला गेलो होतो. मित्र स्थापत्य अभियंता होता. तो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा होता. त्याचं लग्न झालेलं होतं. तीन-चार वर्षांचा एक देखणा मुलगाही होता त्याला. मी त्याच्या घरी पोहोचलो. ती संध्याकाळची वेळ होती. मित्र अद्याप कार्यालयातून आलेला नव्हता. म्हणून मग मी तिथल्या बैठकखोलीतच त्याची वाट पाहात बसलो. बसल्या बसल्या त्यानं मिळविलेल्या ऐश्वर्यावर माझी नजर भिरभिरत होती. आपण मास्तरकीच्या नोकरीत आयुष्यभरही इतकी कमाई करू शकणार नाही, असा विचारही मनाला चाटून गेला. मंद मंद उजेड बैठक खोलीत पसरून राहिला होता. समोरच एका मेजावर काचेच्या भांडय़ात रंगबिरंगी मासे ठेवलेले मला दिसले. ‘त्या चौकोनी भांडय़ाला किंवा जिवंत मासे ठेवतात त्या भांडय़ाला ‘फिश टँक’ म्हणतात,’ मास्तरांचं बोलणं थांबवीत मध्येच एका पोट्टय़ानं माहिती पुरवून आपल्या जनरल नॉलेजच्या कौतुकासाठी वर्गावरून दृष्टी फिरवली. ‘अगदी बरोबर!’ मास्तर म्हणाले. मास्तर पुढे गोष्ट सांगू लागले. ‘फिश टँक’मध्ये हवेचे बुडबुडे सारखे सुरू राहतील, अशी सोय यंत्राच्या सहाय्यानं करून ठेवली होती. रंगीत दिव्याचा प्रकाशझोत फिश टँकवर सोडलेला होता.’ विज्ञान विषय असल्यामुळे मास्तर विज्ञान विषयाशी जुळणारे तपशील बारीकसारीक माहितीसह सांगत होते. ‘ते सगळं वातावरण जादूमय वाटत होतं,’ मास्तर पुढं म्हणाले.
एवढं सारं नजरेत साठविताना एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं. ती गोष्ट म्हणजे, ‘मित्राचा तो लहानगा मुलगा बऱ्याच वेळापासून फिश टँक पाहण्यात, त्यातल्या माशांचं निरीक्षण करण्यात अगदी गढून गेला होता.’ त्याचं इतका वेळ शांत बसून राहणं म्हणजे मुलांच्या चंचलतेला आव्हान दिल्यासारखंच होतं. मनातल्या मनात व्यक्ती अभ्यासात म्हणजे ‘केसस्टडी’त करतात तसं निदानही मी करून घेतलं. थोडय़ा वेळात तो लहानगा मुलगा तिथून उठून गेला. कंटाळला असेल बिचारा! नंतर माझ्या मनात विचार आला, ‘इतका वेळ-तल्लीन होऊन पाहण्यासारखं फिश टँकमध्ये काय होतं?’ म्हणून मीदेखील सहज उस्तुकतेपोटी फिश टँकजवळ जाऊन बसलो. त्यात दोनच मासे होते. ते सारखे इकडून-तिकडे, तिकडून-इकडे, साऱ्या फिश टँकभर फेऱ्या मारत होते. ‘बाहेरचं जग दिसत असतानाही त्या जगात न जाता येणं हे दुर्दैवच म्हणावं लागेल! हेवेदावे, मत्सर, अढीबाजी यांच्या पारदर्शक भिंती उभ्या करून आपणही माणसांनीही आपल्याच विश्वात मग्न का राहावं?’ असाही एक विचार मनात आला.
‘अरे कधी आलास? एकटय़ालाच बसावं लागलं ना बराच वेळ!’ असे तळमळीचे, आनंदानं भरलेले प्रश्न मित्राने विचारले तेव्हा माझी तंद्री भंगली. मी भानावर आलो. त्या दिवशी मित्रासोबत मनसोक्त भटकल्यावर, गप्पा मारल्यावर, लगेच दुसऱ्या दिवशी मी परत निघालो.’
गोष्ट संपली.
एवढय़ा लवकर कशी काय संपली गोष्ट? असा प्रश्न मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसला. एवढय़ात एक धिटुकला पोरगा पुढय़ात येऊन मास्तरांना म्हणाला, ‘सर, अजून सांगा ना गोष्ट! मोठ्ठी गोष्ट सांगा.’ सर, गोष्ट, गोष्ट, गोष्ट सांगा गोष्ट! असा गोंगाट पुन्हा एकदा वाढत गेला. पोरांचा गोंगाट थांबावा म्हणून मास्तर म्हणाले, ‘सांगतो! सांगतो गोष्ट!’ असं म्हणताच गोंधळ थांबला. हळूहळू सगळीकडे चिडीचूप वातावरण झाले. मास्तर मात्र गोष्टीची जुळवाजुळव करण्यात गोंधळून गेले. ‘आता काहीतरी सांगावंच लागणार, त्याशिवाय सुटका नाही!’ असा विचार करून मास्तर बोलू लागले.. आणि गोष्टही थांबली होती तिथून पुढे सरकू लागली..

‘मोकळ्या, विस्तीर्ण जलाशयातून मासे फिश टँकमध्ये बंदी बनविले होते. त्यांचे स्वातंत्र्य गमावले होते. माशांना टिचभर जागेत, बंदिस्तपणे राहायची सवय नव्हती..’ मास्तरांना तत्त्वज्ञानाने मदत केली आणि गोष्ट पुढे सरकू लागली. ‘मंी जेव्हा फिश टँकजवळ बसलो होतो तेव्हा माशांना बोलताना मी पाहिलं,’ असं मास्तरांनी सांगितलं. मासे काय बरे बोलले असतील आपसांत या कल्पनेनंच मुलांची उत्सुकता शिगेला पोचली. ‘मासे काय बोलले असतील,’ असे म्हणत मास्तरांनी मासे बोलतायत अशा संवादांची जुळवाजुळव केली. माशांमधला संवाद सुरू झाला.
पहिला मासा : ‘या नव्या जागेतून बाहेरचं सगळं दिसतं, पण बाहेर जाता येत नाही,’ ‘काचेला धडकून- धडकून तर टेंगूळ आलं माझ्या डोक्याला!’
दुसरा मासा : ‘अरे! बघू बघू! खरंच की रे! किती मोठ्ठं टेंगूळ आलंय तुझ्या डोक्यावर?’
प. मा. : ‘अरे! तुला कसं काय टेंगूळ आलं नाही? तुझी काचेशी टक्कर नाही का झाली?’
दु. मा.- ‘अरे काय सांगू तुला! पहिल्यांदा मीसुद्धा धडकलो काचेवर! पण नंतर एक आयडिया सुचली मला!’
प. मा.- ‘कसली आयडिया? सांग! सांग, लवकर सांग मला!’
दु. मा.- ‘सांगतो! सांगतो, सारख्या धडका होऊ नयेत म्हणून मी काचेपासून थोडं अंतर ठेवून मागे फिरतो. दुसऱ्या बाजूला गेल्यावरही तसंच एक बोट अंतर सोडून काचेपासून मागे फिरतो.’
प. मा.- ‘हंऽ! आता आलं लक्षात! मीसुद्धा आता तुझीच आयडिया वापरतो.’
असा संवाद सांगून मास्तर न थांबता पुढे गोष्ट सांगू लागले.. ‘हळूहळू माशांना फिश टँकमध्ये राहण्याची सवय झाली. सवय पक्की झाली. बंदिस्त असूनही आपण स्वतंत्र आहोत, अशी समजूत माशांनी करून घेतली! सवयी पूर्णपणे नष्ट होत नाहीत, त्यांची जागा दुसऱ्या सवयी घेतात, हेच खरं!’
खरी गोष्ट तर पुढेच आहे, असे म्हणून मास्तर गोष्ट सांगू लागले, ‘पुढच्या काही दिवसांत माझ्या मित्राची बदली मुंबईला झाली. मुंबईत टिचभर जागाही मोठय़ा जिकिरीने वापरावी लागते! तिथे आपला फिश टँक कशाला न्या, जागेची उगी अडवणूक! असा विचार करून, ‘फिश टँक न्यायचाच नाही मुंबईला! आपला मित्र विज्ञान शिकवतो, तेव्हा त्याला या फिश टँकचा नक्कीच उपयोग होईल! आपण त्यांनाच देऊया फिश टँक! अशी मुलाची समजूत तो काढत होता. पण त्याच्या मुलाने आपला हट्ट सुरूच ठेवला होता, ‘फिश टँक मुंबईला न्यायचाच’! मुलाच्या हट्टाखातर त्याने फिश टँकमधले मासे पाण्यासकट एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरले आणि तिचं तोंड घट्ट बांधलं. मात्र, त्याच्या मनात विचार होताच! आणि तो म्हणजे, ‘मुंबईतल्या घरात हे मासे ठेवता येणार नाहीत.’ समुद्रकिनाऱ्याजवळून जाताना त्याने पिशवीचं तोंड उघडून मासे समुद्रात सोडून दिले आणि मगच त्याच्या घरी गेला.
गोष्ट इथेच संपवायला हवी, असा विचार करून मास्तरांनी गोष्ट संपवलीही! पण मासे समुद्रात सोडल्यावर त्यांचं काय झालं असेल, असे कुतूहलजनक प्रश्न मास्तरांना स्वस्थ बसू देईनात! मग मास्तर स्वत:शीच पुटपुटले, ‘मी मुलांना आत्ताच सांगितलं की माशांना बंदिस्त जीवनाची फिश टँकमध्ये सवय झाली’, मग समुद्रातील मोकळ्या वातावरणात, भरपूर पाण्यात, त्यांचे काय बरे झाले असेल? पुन्हा गोष्ट आकारू लागली.. आणि मुले कान देऊन ऐकू लागली..
‘मासे समुद्रात गेल्यावरही फिश टँकमध्येच असल्यासारखे थोडय़ाशाच जागेत फिरत होते. बऱ्याच वेळाने समुद्रातले मासेही तिथे आले आणि या माशांना पाहून त्यातला एक मासा म्हणाला, ‘एवढय़ा मोठय़ा समुद्रात असूनही हे मासे एवढय़ाशा जागेतच का बरे फिरतात? त्यांना वेड तर नाही ना लागलं?’ अशी बोलाचाली समुद्रातल्या माशांमध्ये आपसात चालली होती.
तिथे जमलेल्या समुद्रातील माशांच्या घोळक्यात एक मोठा मासाही होता, ‘हे मासे नक्कीच फिश टँकमधून आले असावेत!’ ही बाब मोठय़ा माशानं आपल्या आजवरच्या अनुभवातून ओळखली आणि ती इतर माशांनाही पटली. ‘बंदिस्त जीवनातल्या सीमांच्या भ्रमाला पुसून टाकता येत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य आपल्या आसपास असतानाही त्याचा उपभोग घेता येऊ शकत नाही. म्हणून स्वातंत्र्याची चव चाखण्यासाठी हे सीमांचे भ्रम तोडून टाकायला हवेत.’ या विचारावर मास्तरही खूष झाले आणि पुढे सांगू लागले.
‘समुद्रातले मासे फिश टँकमधून आलेल्या माशांना म्हणाले, ‘अरे! एवढा मोठा समुद्र आहे पसरलेला आणि तुम्ही एवढय़ाशा जागेत फिरता! अरे, जरा बाहेर पडून पाहा! जगाचा अनुभव घेऊन पाहा!’ फिश टँकातून आलेले मासे म्हणाले, ‘काही नको! काही नको बाहेर पडायला! उगीच आम्हाला शहाणपणा शिकवू नका! इथून बाहेर पडण्याचा वेडेपणा आम्ही केला आणि ही पाहा आम्हाला शिक्षा झाली! असे म्हणत त्यांनी आपल्या डोक्यावरील टेंगूळही समुद्रातल्या माशांना दाखविले!’ हे ऐकून, ‘तुम्ही मोठय़ा समुद्रात आहात’, समुद्रातले मासे म्हणाले. तुम्हाला भ्रम झाला आहे की इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास शिक्षा होईल! अरे, हे खोटं आहे. या! बाहेर या! भ्रमातून बाहेर या! फिश टँकमधले मासे भ्रमातून बाहेर निघत नाहीत असे पाहून, एका मोठय़ा माशाने त्यांना अक्षरश: ओढूनच बाहेर काढलं. पण बाहेर निघाल्यावर त्यांचा भ्रम दूर झाला. बाहेर आल्यावर स्वातंत्र्याचा आनंद त्यांनी लुटला.’
आता खरोखरच गोष्ट संपली.
मास्तरांनी ‘गोष्ट समजली का? कशी वाटली गोष्ट!’ असे उगीचच पोटय़ांना विचारले.
‘खूप छान’! पुन्हा गलका झाला.
मास्तर मात्र बंदिस्त जीवनातल्या सीमा आणि भ्रम यांच्या विचारचक्रात रेंगाळले..
(इंटरनेटवरून)